जिल्हा

पालिकेच्या आवारातच वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हल्ला

पालिकेच्या आवारातच वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हल्ला
पालिकेच्या आवारातच वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हल्ला फोटो: ठाणे वैभव

ठाणे महापौरांच्या ड्रायव्हरची गुंडगिरी 

ठाणे: मीरा-भाईंदर येथील पत्रकारावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातच एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या वाहनचालकाने कॅमेरामन विनय राजभर यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यामध्ये विनय राजभर गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, महापौरांच्या ड्रायव्हरची एवढी गुंडगिरी असेल तर सर्वसामान्य ठाणेकरांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणे महापालिकेच्या आवारात एबीपी माझा या वृत्तवाहिनीची गाडी उभी असताना महापौरांचा वाहनचालक सुनील खरपडे याने तिथे येऊन आधी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कॅमेरामन विनय राजभर आणि त्यांच्या चालकाने याचा जाब विचारला असता, संतापलेल्या सुनील खरपडेने राजभर यांची कॉलर पकडून थेट त्यांचा गळा दाबत बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी महापौरांचा चालक सुनील खरपडे याला ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, ठाण्यातील पत्रकारांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत वाहनचालक सुनील खरपडे याच्यावर कायदेशीर कारवाईची जोरदार मागणी केली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी मुजोर वाहनचालक सुनील खरपडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. महापालिका मुख्यालयासमोरच भरदिवसा वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर झालेल्या हल्ल्याची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने दखल घेतली असून संबंधित वाहनचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून प्रशासनास चौकशीचे आदेश दिले आहेत.

मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असून वाहनचालक माझा असला तरी मी अशा कृत्याचे समर्थन करणार नाही आणि त्याला पाठीशी घालणार नाही. प्रशासनाला याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महापौरांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475